वकिलांच्या वेषातील व्यक्तींनी मला मारहाण केली

0
3

नवी दिल्ली- पातियाळा हाऊस न्यायालयाच्या आवारात मला वकिलांच्या वेषातील व्यक्तींनी मारहाण करून जमिनीवर ढकलले. त्यानंतर मला अमानुष मारहाण केली, अशी साक्ष जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने सर्वोच्च न्यायालयाच्या समितीपुढे शनिवारी दिली.

ज्येष्ठ वकील कपिल सिबल, राजीव धवन, दुष्यंत दवे, ए. डी. एन. राव, अजित कुमार सिन्हा आणि हरेन रावल यांच्या समितीपुढे कुमारने साक्ष दिली.

कुमार म्हणाला की, न्यायालयाच्या दरवाजातून पोलीस मला नेत असताना वकिलांच्या वेषातील काही व्यक्तींनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी पोलीस माझ्यासोबत होते. मात्र त्यांनी माझ्या बचावासाठी काहीही केले नाही, असे त्याने सांगितले.

या प्रकरणी पोलीस उपायुक्त जतीन नरवाल यांना सिबल यांनी पाचारण करून चौकशी केली. न्यायालयाच्या आवारात तुम्ही हल्लेखोरांना हल्ला करण्यास कशी परवानगी दिली. तुमचे पोलीस काय करत होते, अशी प्रश्नांची सरबत्ती समितीच्या सदस्यांनी नरवाल यांच्याकडे केली.