व्याजदरात कपातीची शक्यता

0
7

नवी दिल्ली : जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या ड्यूश बँकेने म्हटले की, आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून 0.२५ टक्क्यांची कपात होऊ शकते. वास्तविक व्याजदरांत मोठी कपात करण्याची मागणी आर्थिक क्षेत्रातून होत आहे, तथापि, कपात छोटीच असेल, असे ड्यूश बँकेला वाटते.

रिझर्व्ह बँक ५ एप्रिल रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. ड्यूश बँकेने म्हटले की, सरासरी वास्तविक व्याजदर १.५ ते २.0 टक्के कायम ठेवण्याच्या आपल्या लक्ष्यावर रिझर्व्ह बँक ठाम आहे. त्याचप्रमाणे २0१६-१७ या वर्षासाठी उपभोक्ता मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ५ टक्के राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे रेपो दर ६.५0 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यास वाव आहे. याआधी २ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले होते.