गुजरातमध्ये प्राथमिक शिक्षकांचा तुटवडा

0
8

अहमदाबाद (वृत्तसंस्था): गुजरातमध्ये शिक्षकांअभावी शैक्षणिक स्तर घसरल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच राज्यातील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये १३ हजारावर शिक्षकांची कमतरता असल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.

गुजरात विधानसभेत अलिकडेच सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शिक्षकांची १,८०,६०१ पदे मंजूर असताना केवळ १,६७,४६१ कार्यरत आहेत. याचाच अर्थ शिक्षकांची १३,१४० पदे अजूनही रिक्त आहेत. जिल्हानिहाय आकडे बघितल्यास असे लक्षात येते की कच्छ आणि बनासकांठा हे दुर्गम जिल्हे तसेच पंचमहल व दाहोद या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचा सर्वाधिक तुटवडा आहे. कच्छमध्ये २,७२४, बनासकांठात १,७४१, पंचमहल ९३५ आणि दाहोदमध्ये ९१२ पदे रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शाळांमध्ये (सहावी ते आठवी) गणित आणि विज्ञान हे विषय शिकविणारे २,४०० शिक्षक नाहीत.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की शासनाद्वारे संचालित उच्च प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या २,४१३ शिक्षकांची भरती शासनाला करावी लागणार आहे.

बनासकांठात गणित आणि विज्ञान विषयाचे ४०४ शिक्षक कमी आहेत. तर पंचमहलमध्ये ३८२, अहमदाबादेत २३० आणि दाहोदमध्ये २०३ शिक्षक हवे आहेत.