छत्तीसगडमध्ये ११ हजार अतिरिक्त जवान पाठवणार

0
7

नवी दिल्ली- माओवाद्यांचा प्रभाव अधिक असलेल्या बस्तर जिल्ह्यात आणखी ११ हजार जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बस्तर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या हत्याकांडात सीआरपीएफचे १४ जवान शहीद झाले होते.

छत्तीसगडमध्ये ११ नवीन बटालियन, सीआरपीएफच्या १० बटालियन आणि सीमा सुरक्षा दलाची एक बटालियन असणार आहे. बस्तर जिल्ह्यात माओवाद्यांचा मोठा प्रभाव असल्यानेच केंद्रीय गृहखात्याने अतिरिक्त जवान तैनात करण्याचे ठरवले आहे.

बस्तर विभाग हा संपूर्ण भाग घनदाट अरण्याचा असून त्यात सात जिल्हे येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओदिशा राज्याच्या मध्यवर्ती भागात हा विभाग येतो. या भागात बिजापूर, सुकमा, दांतेवाडा, बस्तर, कोंडागाव, नारायणपूर, कंकर आदी जिल्हे येतात. या भागात यापूर्वी सीआरपीएफचे ३१ हजार जवान तैनात आहेत. तसेच सीआरपीएफचे विशेष दल ‘कोब्रा’ हे ही या भागात आहेत.

बस्तर विभाग ४० हजार चौरस किलोमीटर आहे. नवीन १० बटालियन सैन्य दल सुकमा व दांतेवाडा भागात तैनात केले जाणार आहे. तर कंकर विभागात सीमा सुरक्षा दलाची तुकडी तैनात केली जाईल.

बस्तरच्या जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलांचे अधिक बळी गेले आहेत. एप्रिल २०१० मध्ये दांतेवाडा येथील माओवाद्यांच्या हल्ल्यात ७६ जवान ठार झाले होते.