पंतप्रधानांचा मुक्काम स्वदेशी आहे की परदेशी – सेना

0
7

मुंबई – ‘मोदी यांनी ज्याप्रमाणे “अच्छे दिन‘ची आशा दाखवली, त्याप्रमाणे “गरिबी हटाव‘चे नारे देत कॉंग्रेसने गरीबांना जास्त गरीब व श्रीमंतांना जास्त श्रीमंत केले. काळा पैसा वाढला व परदेशी बॅंकांत ही लूट गेली. हा काळा पैसा परत आणू व जनतेच्या बॅंक खात्यात प्रत्येकी किमान 15 लाख जमा होतील असे वचन श्री. मोदी यांनी दिले होते. पण हे आश्‍वासन दोन वर्षांत पूर्ण झालेले नाही‘, असे म्हणत शिवसेनेचे केंद्र सरकारला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आपल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशभर सरकारच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. मात्र केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने दोन वर्षांचा लेखाजोखा “सामना‘तील अग्रलेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “दोन वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधानांचा मुक्काम स्वदेशी आहे की परदेशी ते पाहावे लागेल. पंतप्रधान बहुधा इराणला होते व तेथून ते आसाम येथे भाजप राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी गेले असावेत‘, असे अग्रलेखात म्हटले आहे.जनतेने मोदी सरकारला पाच वर्षांसाठी निवडले असल्याचे म्हणत शेवटच्या वर्षांतच सरकारबद्दल काही सांगणे उचित ठरणार असल्याचे अग्रलेखात शेवटी म्हटले आहे. तसेच “सध्या तरी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत‘ अशा शब्दांत सरकारला शुभेच्छाही दिल्या आहेत.