सुनील लांबा नवे भारतीय नौदल प्रमुख

0
9

– वृत्तसंस्था

नवी दिल्ली – अॅडमिरल सुनील लांबा (५८) यांनी आज येथे भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. मावळते नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धोवन हे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. 

लांबा नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी असतानाच सरकारने गेल्या ६ मे रोजीच त्यांची नियुक्ती नौदलप्रमुखपदावर निश्चित केली होती. अॅडमिरल लांबा यांना नौदलप्रमुख म्हणून ३१ मे  २०१९ पर्यंत पूर्ण तीन वर्षांचा कार्यकाळ लाभणार आहे. आपल्या ३८ वर्षांच्या सेवेमध्ये अॅडमिरल लांबा यांनी ऑपरेशनल आणि स्टाफ अशा दोन्ही प्रकारच्या विविध पदांवर काम केले आहे. आय. एन. एस. काकीनाडा (सागरी सुरुंग-विरोधी ), आय. एन. एस. हिमगिरी, आय. एन. एस. मुंबई  तसेच आय. एन. एस. रणविजय या युद्धानौकांचे ते प्रमुख अधिकारी होते. अॅडमिरल लांबा यांना त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आलेले आहे.