बॅंक कर्मचाऱ्यांचा 29 जुलै रोजी देशव्यापी संप

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.13- केंद्र सरकारने बॅंकिंग क्षेत्रात राबविलेल्या सुधारणा जनतेच्या हिताविरुद्ध असल्याचे म्हणत बॅंक कर्मचाऱ्यांनी या सुधारणांना विरोध दर्शविला असून त्यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांनी 29 जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स (युएफबीयू) या संपाचे नेतृत्व करणार आहे. आयडीबीआय बॅंकेचे खासगीकरण, बॅंकिंग क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) यासारख्या काही निर्णयांविषयी सरकार आणि बॅंकिंग क्षेत्रात दुमत आहे. त्याचाच निषेध नोंदविण्यासाठी युएफबीयूच्या नेतृत्त्वाखाली 9 कर्मचारी संघटना व 10 लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी एच वेंकटचलम म्हणाले, “केंद्र सरकारच्या बॅंकिंग क्षेत्रातील सुधारणा जनविरोधी आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांशिवाय, क्षेत्रीय ग्रामीण बॅंक, परदेशी बॅंका व सहकारी बॅंकांमधील कर्मचारी 29 जुलै एक दिवसीय संपावर जाणार आहेत.‘ याआधी कर्मचाऱ्यांनी 12 व 13 जुलै रोजी संप पुकारला होता. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तो रद्द करण्यात आला.