अत्याचारांना आळा घालून सुसंस्कृत देश घडवा: राष्ट्रपती

0
4

नवी दिल्ली: सध्याच्या काळात वाढत असलेले दलित, महिला, मुले आणि समाजातील दुबळ्या घटकांवर होणारे अन्याय हा देशाच्या सुसंकृत प्रतिमेवर असलेला कलंक आहे. हा कलंक दूर करून सुसंस्कृत आणि समृद्ध देशाची उभारणी करण्याचे आव्हान सर्व भारतीय नागरिकांसमोर आहे; असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.

भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांना संदेश दिला. अत्याचार करणार्‍या समाजद्रोही शक्तींचा बीमोड करून भारताची प्रगतीकडे जोमदारपणे वाटचाल सुरूच राहिल; असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

मागील चार वर्षांपासून भारतीय समाजात फुटीरतावादी आणि मुजोर शक्तींमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे समाजाच्या दुबळ्या घटकांवर होणार्‍या अन्याय, अत्याचारांचे प्रमाणही वाढते आहे. या शक्तींचा पूर्ण शक्तीने प्रतिकार करणे अत्यावश्यक आहे; असे राष्ट्रपतींनी नमूद केले. महिला आणि बालके यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात अपयश आल्यास संपूर्ण समाजाच्या सुसंस्कृत प्रतिमेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते. महिला आणि बालकांवरील अत्याचाराची प्रत्येक घटना ही समाजाच्या मनात कळ उत्पन्न करणारी असते. त्यांना सुरक्षितपणा प्रदान करू शकत नाही; तोपर्यंत आपण आपल्याला सुसंस्कृत समाज समजू शकत नाही; असे राष्ट्रपतींनी सांगितले.

दलितांवरील अत्याचाराबाबत देशभर चर्चा झाडात असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारवर या मुद्द्यावरून टीकेची झोड उठविली होती. महिलांवरील अत्याचारांबाबतही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचा राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात परामर्श घेतला.