शकुंतला रेल्वे लाईनचे भारतीय रेल्वेत होणार विलीनीकरण

0
7
नवी दिल्ली, दि. २७ – भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची आहे. पण भारतात एक रेल्वेमार्ग असा आहे जो खासगी मालकीचा आहे. शकुंतला रेल्वे असे या रेल्वेमार्गाचे नाव असून, लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे.
विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा १८८ किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या मालकीचा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग ताब्यात घेण्याच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे. ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने १९१० साली शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जायचा. स्वातंत्र्यानंतर अन्य खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले. पण शुकंतला रेल्वे मार्गाची मालकी खासगी कंपनीकडेचं राहिली. करारानुसार भारत सरकारने हा मार्ग २०१६ मध्ये ताब्यात घेतला नाही तर, राष्ट्रीयकरणासाठी आणखी दशकभर थांबावे लागेल.
या अरुंद रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यामुळे दिल्ली-चेन्नई-बंगळुरुमधील अंतर ८० किमीने कमी होईल. हा मार्ग वापरण्यासाठी भारतीय रेल्वे शकुंतला रेल्वेला वर्षाला २ ते ३ कोटी रुपये दोते. दोन प्रवासी गाडया आणि काही मालगाडया या मार्गावरुन धावतात. सध्या शकुंतला रेल्वेची मालकी भारतीय व्यक्तीकडे आहे.