जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे पनीरसेल्वम यांचे आदेश

0
16

चेन्नई,वृत्तसंस्था दि. 8 – तामिळनाडूच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असतानाच पनीरसेल्वम यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या तपासाची सूत्रं निवृत्त न्यायाधीशांकडे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडून बळजबरीनं मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी मंगळवारी केला होता.
बुधवारी मीडियासोबत बोलताना ‘पक्षातील कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केल्यास राज्यपालांची भेट घेऊन आपण दिलेला राजीनामा मागे घेऊ. शिवाय, भाजपाच्या इशा-यांवरुन काहीही करत नसून, आपण पक्षाचा कधीही विश्वासघात केला नाही’, आपण पक्षाला कुठलाही दगा दिला नसल्याचं स्पष्टीकरणही पन्नीरसेल्वम यांनी दिलं.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यांच्या मृत्यूवर मद्रास उच्च न्यायालयानेही शंका व्यक्त केली होती. शिवाय प्रसार माध्यमांनीही संशय व्यक्त केला होता. मात्र, 6 फेब्रुवारीला अपोलो हॉस्पीटलकडून जयललितांच्या रक्तात संसर्ग झाला होता. हा संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले. एकेक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्ट करण्यात आले होते.