मा. केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांना केंद्राच्या उडान योजनेवर शंका

0
11

गोंदिया, ता 1 – रामदेवबाबा प्रमाणेच विदर्भातील इतर उद्योगसमुहांना देखील नागपुरात मिहान मध्ये २५ लाख प्रती एकरप्रमाणे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी केंद्रीयमंत्री प्रफुल पटेल यांनी सरकारकडे केली आहे. श्री पटेल यांनी केंद्र सरकारच्या उडान योजनेवर देखील शंका व्यक्त करीत शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेचा कर्ज न फेडण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसा पूर्वीच उडान योजना लाँच केली. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील ७ मुख्य शहरांना हवाई वाहतुकीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, यात विदर्भातील एकाही विमानतळाचा समावेश नसल्याने वैदर्भिय जनतेच्या पदरी निराशा पडली असून माजी केंदिय मंत्री राज्यसभा सदस्य खासदार प्रफुल पटेल यांनी या योजनेवर शंका व्यक्त केली आहे. या योजनेत नांदेड मुंबई -नांदेड – हैद्राबाद ही वाहतूक सेवा जून २०१७ मध्ये सुरु होणार आहेत. नाशिक ओझर ते मुंबई ही सेवा सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु होणार आहेत. कोल्हापूर मुंबई सप्टेंबर २०१७ मध्ये तर जळगाव मंबई सप्टेंबर २०१७ मध्ये सूरू होणार असून सोलापूर मुंबई सप्टेंबर २०१७ सुरू होणार आहे. मात्र, विदर्भातील एकही विमानतळाचा या योजनेअंतर्गत विचार केला नाही. या योजनेविषयी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की,
केंद्र सरकारने उडान योजना सुरु केली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ज्या पद्धतीने सदर योजना आखण्यात आली आहे, त्यामुळे ती यशस्वी होईल की नाही त्याविषयी शंका आहे. श्री पटेल पुढे म्हणाले की,आम्ही सुद्धा ही योजना आखली होती.
मिहान बद्द्ल बोलताना केंद्रसरकारने रामदेव बाबा यांना पतंजलीच्या कारखान्या करीता मिहान मध्ये कुठलीही टेंडर प्रकीया न करता २५ लाख रुपये प्रमाणे ३०० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, एखादा व्यक्ती जर नागपूर सारख्या शहरात २५ लाख रुपये प्रमाणे जागा विकत घेण्यास तयार असेल तर त्याला सरकार जागा उपलब्ध करून देईल काय आणि त्यामध्ये किती लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी टीका प्रफुल पटेल यांनी नितीन गडकरींवर केली.
शेतकऱ्यांनी जिल्हा बँकांचे पीक कर्ज भरू नये २०१४ मध्ये आघाडी सरकार असताना धानाला ३ हजार रुपये भाव दिले. मात्र, तीन वर्षे लोटून देखील शेतकऱ्यांच्या धानाला २ हजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. त्यामुळे शेतकरी जिल्हा बँकेचा कर्ज कुठून भरणार, असा सवाल करीत शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये, असा सल्ला श्री पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला.