सफाई कामगारांचे प्रश्न गांभीर्याने सोडवा- दिलीप हाथीबेड

0
19

गोंदिया,दि.2 : स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. ज्या यंत्रणांकडे सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबीत आहे त्यांनी या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक गांभीर्याने वेळीच करावी असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल शनिवारी (ता.1) जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेताना ते बोलत होते. या सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना हाथीबेड म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगार असले पाहिजे. शासन निर्णयाप्रमाणे त्यांना वेतन मिळाजे पाहिजे. शहराची स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांची महत्वाची भूमिका आहे.परिणामी, सफाई कामगारांची रिक्त पदे वेळीच भरावी, असे त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला सूचविले.
नोव्हेंबर 2017 मध्ये या आयोगाचा अहवाल पंतप्रधानांना देणार असल्याचे हाथीबेड यांनी सांगितले. सफाई कामगारांच्या शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभवाच्या आधारे त्यांना पदोन्नती दिली गेली पाहिजे, असेही ते म्हणावे,
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी काळे म्हणाले की, जिल्ह्यातील सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल. कामगारांचे वेतन शासनाकडून प्राप्त होताच त्यांना वेळीच वितरीत करण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार म्हणाले, जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या सफाई कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. या कामगारांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
रोजंदारी सफाई कामगारांचे प्रश्न, नियमीत काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेणे, सफाई कामगारांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवावरुन पदोन्नती देणे, पाचवा व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ सफाई कामगारांना देणे, लाड व पागे समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणे, सफाई कामगारांच्या वारसा हक्कांची प्रकरणे निकाली काढणे, दर 3 वर्षांनी सफाई कामगारांना गणवेश देणे, यासह त्यांच्या अन्य समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली.
या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, रोजगार मार्गदर्शन अधिकारी श्री.माटे यांच्यासह विविध सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.