उडान’द्वारे पर्यटन, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0
14
????????????????????????????????????

नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस व्हिडीओलिंकींगद्वारे प्रारंभ

 नांदेड, दि. 27 – ‘उडान’- उडे देश का आम नागरिक’ या योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगिक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘उडान’ या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे आज करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी शिमला येथून बोलत होते.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले, परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. पर्यटन, औद्योगिकीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी विमान कंपन्यांना सूचित केले.
तत्पुर्वी, नांदेड विमानतळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी
ठेवून उडान या संकल्पनेला प्रधानमंत्री मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. श्री. संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासदार अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.