लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांना निवेदन;समस्यांसाठी शिक्षकांचा एल्गार!

0
19

गोंदिया ,दि.27 : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने २८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयात नवीन बदल धोरणातील तरतूदीचा फेरविचार करण्यात यावा तसेच शिक्षकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांना घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्यावतीने बुधवार २६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजन करण्यात आले होते. या पाश्‍वभूमीवर गोंदियातही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन पाठविले.जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी धरणेमंडपात येऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवेदन स्विकारले,तसेच बदली प्रर्कियेत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.

निवेदनातील मागण्यांमध्ये ग्राम विकास विभागाने काढलेल्या नवीन बदली धोरण शिक्षकांच्या हिताच्या नसल्याने त्यातील तरतूदी सुधारित करण्यात याव्यात तसेच प्रशासकीय बदल्या तालुक्यातच करण्यात याव्या, विनंती करून किंवा स्वच्छेने जे शिक्षक जाण्यास तयार आहेत त्यांना बदली देण्यात यावी, अतिदुर्गम भागात जे शिक्षक स्वच्छेने राहण्यास तयार आहेत त्यांची बदली करण्यात येऊ नये, १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, जिल्हा परिषद शाळांतील मुला-मुलींना मोफत गणवेश देण्यात यावे, जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळेतील विद्युत बिल जिल्हा परिषदेकडून भरण्याची तरतूद करण्यात यावी, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी, प्रसुती रजेवर असलेल्या शिक्षकांच्या रजा कालावधीत हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मान्य करण्यात यावे, विधान परिषदेत दिलेल्या आश्‍वासनानुसार संगणक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय निर्गमित करून वसुली थांबविण्यात यावी व तिची परतफेड करण्यात यावी, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना गट विमा लागू करण्यात यावा याशिवाय प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन देण्यात यावे, १२ वर्ष पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लावण्यात यावी यासह अनेक मागण्यांचा समावेश होता. यातील राज्य पातळीवरच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी, जिल्हा पातळीवरील समस्यांसाठी हे आंदोलन उभारले असल्याचे शिक्षक संघाच्यावतीने सांगण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष व शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कटरे, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, अनिरुद्ध मेश्राम, टी.के. नंदेश्‍वर, यू.पी. पारधी, नागसेन भालेराव, सुधीर वाजपेयी, केदार गोटाफोडे, वाय.एस.भगत, बी.बी.ठाकरे, शंकर नागपुरे, ओमेश्‍वरी बिसेन, गौरीशंकर खराबे, गणेश चुटे, विनोद लिचडे,शंकर चव्हाण,अयुब खान यांच्या शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर शासनाला जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले.