विमान प्राधिकरणाकडून अपघातस्थळाची पाहणी

0
8

गोंदिया,दि.28-येथील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अपघात होऊन कोसळले होते. या अपघातात जागीच ठार झालेले दोन पायलट रंजन गुप्ता यांच्यावर गोंदिया येथे; तर, प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरुदयावसिंह कल्याण हिच्यावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीसाठी आलेल्या दिल्ली येथील विमान प्राधिकरणाच्या समितीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पायलट रंजन गुप्ता हे गोंदियातील अंगुर बगीचा भागात कुटुंबीयांसह भाड्याने राहत होते. गुप्ता हे गेल्या चार वर्षांपासून नॅशनल फ्लाइंग अकादमीसोबत काम करीत असलेली कनेडियन कंपनी सीएआयमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नी श्रावणी ह्या स्थानीक पोद्दार स्कूलमध्ये नोकरीला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गुप्ता हे गेल्या १८ वर्षांपासून विमान चालवित होते.
हिमानी कल्याण हिचे वडीलसुद्धा वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे आपल्या मुलीनेही पायलट व्हावे, या उद्देशाने ‌त्यांनी हिमानीला प्रोत्साहित केले होते. हिमानीचा मृतदेह गुरुवारी तिचे कुटुंबीय दिल्लीला घेऊन गेले होते. या घटनेनंतरही सीएएआयच्यावतीने अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.