ओबीसी युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण

0
15

गडचिरोली ,दि.28: स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २३ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित ओबीसी युवा महोत्सवाचा समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ओबीसी कॅडर कॅम्पचे प्रमुख मार्गदर्शक अभियंता अरविंद माळी, साहित्यिक प्रा. डॉ. बळवंत भोयर , नगरसेवक सतीश विधाते, दादाजी चापले, दादाजी चुधरी, प्रा. शेषराव येलेकर, पांडुरंग घोटेकर, विनायक बांदूरकर, डी. के. उरकुडे, संजय निशाने, डॉ. सुधा सेता, प्राचार्य जी. एम. दिवटे आदी उपस्थित होते.समारोपीय कार्यक्रमात अनिल म्हशाखेत्री, डॉ. नामदेव उसेंडी, अरविंद माळी, डॉ. बळवंत भोयर, सतीश विधाते, प्राचार्य दिवटे यांनी मार्गदर्शन करीत ओबीसींनी एकजूट होण्याचे आवाहन केले.

युवा महोत्सवात कबड्डी, बुद्धिबळ व समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. कबड्डी स्पर्धेसाठी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रायोजित १५ हजार १ रूपये रोख पारितोषिक व चषक जय गुरूदेव क्रीडा मंडळ नवेगाव क्र. १ यांनी पटकाविला. जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे व नगरसेवक सतीश विधाते यांच्याकडून प्रायोजित १० हजार १ रूपये व चषकाचे द्वितीय पारितोषिक जय गुरूदेव क्रीडा मंडळ नवेगाव क्र. २ यांनी पटकाविला. बुद्धिबळ स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार १ रूपये व चषक अजय निंबाळकर याने पटकाविले. कल्पतरू बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्याकडून प्रायोजित द्वितीय पारितोषिक व चषक भाग्यश्री भांडेकर हिने पटकाविले. माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी व कुणाल पेंदोरकर यांनी प्रायोजित केलेले गु्रप डान्स स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १० हजार १ रूपये रोख व चषक गणराज ग्रुप डान्स सिंदेवाही यांनी पटकाविला. जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्याकडून प्रायोजित द्वितीय पारितोषिक ७ हजार १ रूपये व चषक डॅचलर ग्रुप डान्स अहेरी यांनी पटकाविले.

तिन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय ठाकरे तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे, अक्षय ठाकरे, नयन कुनघाडकर, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे यांनी सहकार्य केले.