बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड

0
10
  • नवी दिल्ली, दि. 6 – बनावट जात प्रमाणपत्राद्वारे डिग्री किंवा नोकरी मिळवणा-यांना सर्वोच्च न्यायालयानं झटका दिला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक निर्बंध लादले आहेत. जर एखादी व्यक्ती बनावट जात प्रमाणपत्रासोबत पकडली गेल्यास त्याला डिग्री आणि नोकरी गमवावी लागणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.बनावट जात प्रमाणपत्र बाळगणा-या व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते, असंही कोर्टानं स्पष्ट केले आहे. कोणी व्यक्ती ब-याच काळापासून नोकरी करते आणि ती व्यक्ती दोषी आढळली, तरीही नोकरी सोडावी लागणार आहे. नोकरी करत असताना 20 वर्षांहून अधिकचा काळ झाला असला तरी बोगस जात प्रमाणपत्रामुळे त्याला नोकरी गमवावी लागेल, त्याचबरोबर त्याच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनंही बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणा-याचं जात प्रमाणपत्र रद्द केले जाईल, असंही सांगितलं होतं.आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय सरकारी विभागांमध्ये निर्देश जारी केले आहेत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोक-या मिळवणा-यांवर कारवाई करावी. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनीही मार्च महिन्यात लोकसभेत याबाबत माहिती दिली होती. जवळपास 1832 लोक असे आहेत की त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोक-या मिळवल्या आहेत. या कारवाईत 276 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. आणि 251 जणांवर कारवाई सुरू आहे. तसेच 1035 प्रकरणांत कायद्याची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवणारी व्यक्ती कधीपासून नोकरीवर आहे हे महत्त्वाचे ठरणार नाही. एखादी व्यक्ती 20 वर्षांपासून अधिक काळ नोकरीवर असली तरी त्याची नोकरी जाणारच आहे, असे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले आहे.