संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांची माहिती

0
8

नवी दिल्ली,दि.22- संसदेचं हिवाळी अधिवेशन घ्यायला भाजपाकडून उशीर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचा हा आरोप भाजपाने फेटाळला असून सरकार डिसेंबरमध्ये अधिवेशन घेणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं आहे. यूपीए सरकारच्याकाळातही अनेकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा पुढे मागे करण्यात आल्या होत्या असंही अनंतकुमार यांनी म्हंटले.

विरोधकांना सोयीच्या विसराळूपणाचा आजार झाला आहे. काँग्रेसप्रणीत यूपीएच्या काळातही हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा प्रकार 2008 व 2013 मध्ये झाला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हंटले की, विधानसभा निवडणुकीचा परिणाम संसदेच्या अधिवेशनावर होतो. याआधीच्या सरकारनेही अधिवेशन घ्यायला विलंब केला होता. विधानसभा निवडणूक व अधिवेशन एकाच काळात येऊ नये यासाठी काळजी ही घेतली जात असते, पण असं काँग्रेसच्या काळातही झालं आहे त्यामुळे भाजपा संसदेच्या हिवाळी अधिवेशनास मुद्दाम विलंब करीत असल्याच्या आरोपत तथ्य नाही, असंही ते म्हणाले.याआधी हिवाळी अधिवेशन दोन वेळा नाताळनंतर सुरू झाले होते. काँग्रेसला गुजरात व हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे, म्हणून काँग्रेसकडून विविध कारण शोधली जात असल्याचं त्यांनी म्हंटले.संसदेचे हिवाळी अधिवेशन नेहमी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. पण सरकारकडून गुजरातमध्ये 9 आणि 12 डिसेंबर अशा दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमुळे अधिवेशन लांबणीवर पडले आहे.