संविधानदिनानिमित्त अभिवादन सभा,खा.शेट्टी येणार

0
13

भंडारा,दि.22 : संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा, दुचाकी रॅली, प्रबोधन समारंभ व बक्षिस वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याची माहिती संविधान दिन समारोह कार्यक्रमाचे संयोजक पुरण लोणारे यांनी पत्रपरिषदेत दिली.
रविवारला सकाळी ९ वाजता त्रिमूर्ती चौकातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वसंतराव हुमणे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपस्थिती राहणार आहेत.
त्यानंतर बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून संविधान रॅली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलात संविधान प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार नाना पटोले, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस.एन. पठाण, प्रा.नंदाताई फुकट, अ‍ॅड.संदेश भालेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी २५ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या संविधान परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व प्राचार्यांचा संविधान ग्रंथ देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सप्तखंजिरीवादक तुषार सूर्यवंशी यांचे संविधानीक मुलभूत हक्क व अधिकार यावर प्रबोधनाचा कार्यक्रम होईल, असे पुरण लोणारे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रा.वामन शेळमाके, प्राचार्य विनोद मेश्राम, एम.आर. कान्हेकर, डी.व्ही. बारमाटे, दिगांबर मेश्राम, प्रेमदास धारगावे, राहुल गजभिये उपस्थित होते.