होऊ शकते नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती

0
7

नवी दिल्ली – दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर लगाम ठेवण्यासाठी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नवा डाव खेळण्याची तयारी करीत आहे. केंद्र सरकार दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना हटवून दुसर्‍या व्यक्तीला त्या पदावर नियुक्त करण्याची तयारी करीत आहे. जंग यांची बदली दुसर्‍या एखाद्या राज्यात होऊ शकते. या महिन्याच्या शेवटापर्यंत केंद्र सरकार या संबंधीच्या निर्णयाला मूर्तरूप देऊ शकते.
जंग यांची काँग्रेससोबत जवळीक
नायब राज्यपाल नजीब जंग काँग्रेसच्या जवळचे मानले जातात. आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतात. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, जंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपवर निशाणा साधू शकत नाही. त्यासोबतच जंग यांना तडकाफडकी हटवून सरकार नव्या वादाला जन्म देऊ इच्छित नाही. त्यामुळेच त्यांना दुसर्‍या राज्याचे राज्यपालपद देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जंग यांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला होकार दिला तर केंद्र सरकारला जड जाऊ शकते. सरकारला भीती आहे, की मोदी लाटेचा करिष्मा जसा दिल्लीत जाणवला नाही आणि यांच्या सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्याचा परिणाम बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या निकालावर होईल. देशाच्या राजधानीत आपला सीमित करण्यासाठी मोदी सरकार सर्व प्रथम जंग यांना राजधानीबाहेर काढू इच्छित आहे.
अरुण माथूर होऊ शकतात नवे नायब राज्यपाल
1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अरुण माथूर नजीब जंग यांची जागा घेऊ शकतात. 2012 मध्ये इडीचे प्रमुख राहिलेले माथूर सध्या दिल्लीत बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत. याआधी ते दिल्ली जल बोर्डाचे सीईओ होते. माथूर यांची स्वच्छ प्रतिमा आणि त्यांना दिल्लीत काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे त्यांची या पदावर वर्णी लागू शकते. कॅबिनेटमधील मंत्र्यांनी आणखी तीन नावे दिली आहेत. त्यात अनिल बैजल, शक्ती सिन्हा आणि यशोवर्धन आझाद यांचा समावेश आहे. त्यात माथूर वरच्या क्रमाकांवर आहेत.