डिजिटल इंडियामुळे पाच कोटी सरकारी नोकर्‍या : रविशंकर प्रसाद

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,-केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर पाच कोटी लोकांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची घोषणा टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
सामान्य नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा आणि सरकारी सेवाक्षेत्राशी जोडणे हा डिजिटल इंडिया या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाला आणखीही काही उपक्रम संलग्न असून, त्यावर साधारण एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा उपक्रम पूर्ण होताच पाच कोटी लोकांना सरकारी नोकर्‍या मिळणार आहेत, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत बोलताना दिली.
या उपक्रमाअंतर्गत युवकांच्या कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षात ई-कॉमर्स क्षेत्राचा चांगला विकास झाला असून अनेक कंपन्या लहान शहरांसह ग्रामीण भागांमध्ये बीपीओ सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी युवकांच्या प्रशिक्षणासाठी संगणक वर्ग आणि इतर कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्याची समस्या सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी मान्य केले. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्युत पुरवठ्याच्या विशेष सोयी करण्यात येणार आहेत. त्यासाठी उपक्रम पूर्ण होताच स्थानिक नेत्यांना आग्रह केला जाईल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.