अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल छत्तीसगडला पुरस्कार

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी
अक्षय ऊर्जाक्षमतेत वाढ करून सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्याला सन्मानित केले.
येथे आयोजित अक्षय ऊर्जा विश्‍व गुंतवणूकदार संमेलनात छत्तीसगडच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अमनसिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सिंह म्हणाले की, आम्ही सौर ऊर्जेतून ४५ मेगावॅट व धानाच्या भुशापासून २०० मेगावॅट वीज निर्माण करण्याचे प्रशंसनीय कार्य केले असून राज्यातील ६०० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०० सामुदायिक आरोग्य केंद्रे, ३५० पोलिस ठाणी, १८०० आदिवासी विद्यार्थी वसतिगृहे, २३ जिल्हाधिकारी कार्यालये यांसह १७०० गावांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर अनेक गावांमध्ये पेयजल योजनेसाठी तीन हजार सौर पंप तसेच १५०० सिंचन योजनांसाठी सौर ऊर्जेचा उपयोग होत आहे.
१३ व्या वित्त आयोगाने निश्‍चित केलेल्या मानदंडाच्या आधारे छत्तीसगडची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.