आम आदमी पार्टीमध्ये तू तू मै मै

0
11

नवी दिल्ली, दि. २ – नवी दिल्लीत काँग्रेस व भाजपाला नामोहरम करत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये दुहीची लागण झाली असून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव विरुद्ध केजरीवाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना आपापल्या पदावरून उतरण्यास सांगण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. बुधवारी आपची नॅशनल एग्झिक्युटिव्हची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आपचे नेते आशुतोष यांनी सांगितले. नॅशनल एग्झिक्युटिव्हमध्ये २१ जणांचा समावेश असून त्यामध्ये यादव व प्रशांत भूषण या दोघांचाही समावेश आहे.
केजरीवाल यांना लक्ष्य करून त्यांना नॅशनल कन्वेनर पदावरून हटवण्याचे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी प्रशांत भूषण व यादव यांच्यावर केला आहे. तर, केजरीवाल यांच्यावर यादव यांनी उघड टीका केली आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हरयाणा व अन्य ठिकाणी झालेल्या पराभवासाठी यादव व केजरीवाल यांनी एकमेकांना देषी ठरवल्यानेही पक्षामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे समोर आले. त्यात उद्योगक्षेत्रातल्या हेरगिरीसंदर्भात काही कादगपत्रे प्रशांतभूषण गटाने मीडियाकडे पोचवल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. तर आप ही केजरीवाल सेंट्रिक पार्टी झाल्याचा आरोप करत पक्षातच स्वराज्याची गरज असल्याचेमक प्रशांतभूषण यांनी व्यक्त केले आहे.