‘भू-संपादन’वरून मोदी सरकारला अण्णा घेरणार, शिवसेनेचीही आक्रमक भूमिका कायम

0
14

मुंबई- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भू-संपादन विधेयकावरून मोदी सरकारला झटका देण्याच्या तयारीत आहेत. अण्णा हजारे येत्या काही दिवसात वर्ध्यातील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापासून थेट दिल्लीपर्यंत पदयात्रा काढणार आहेत. भू-संपादन विधेयक हे कसे शेतकरी विरोधी आहे हे सांगण्यासाठी व शेतक-यांत जनजागृती करण्यासाठी ही पदयात्रा काढली जाणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या विधेयकावरून मनधरणी केल्यानंतरही पाठिंबा देण्यास विरोध कायम ठेवला आहे. या विधेयकाबाबत एनडीए घटकपक्षांची बैठक बोलावली जावी अशी भूमिका मांडत उद्धव यांनी ना चा पाढा वाचला आहे.मोदी सरकारने भू-संपादन विधेयकाचा अध्यादेश संसदेला बायपास करून मंजूर करून घेतला आहे. त्यात काही शेतकरीविरोधी व जाचक अटी आहेत. या आंदोलनाला भाजप वगळता सर्वच पक्षांनी विरोध केला आहे. मित्रपक्ष अकाली दल व शिवसेनेनेही विरोध दर्शिवला आहे. मात्र, मोदी सरकारने हे विधेयक उत्तम असून याप्रकरणी बॅकफूटवर जाण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगत आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेत विरोधी पक्षांना न जुमानता मोदी सरकारने त्यांना हवे तसेच भू-संपादन विधेयक सादर केले आहे. अण्णा हजारेंनी व देशातील काही शेतकरी संघटनांनी हे विधेयक शेतकरीविरोधी असून त्यांना देशोधडीला लावणारे आहे असे सांगत दिल्लीत जोरदार आंदोलन केले. मात्र, भाजपने अण्णांच्या विरोधात एक पुस्तिका काढून ‘अण्णा हजारे इस बार आप गलत है’ असे सांगत जोरदार टीका केली. याचबरोबर अण्णांच्या सहकारी मेधा पाटकर यांच्यावरही भाजपने हल्लाबोल चढविला. त्यामुळे अण्णांचे पित्त खवळले असून, त्यांनी आता देशभरातील शेतक-यांत मोदी सरकार व भू-संपादन विधेयकाबाबत जनजागृती करण्याचा ठरविले आहे.