एअर इंडिया, एमटीएनएल आणि हिंदुस्थान शिपयार्डसह पाच आजारी उद्योग बंद होणार

0
11

सरकारची लोकसभेत माहिती
वृत्तसंस्था
नवी दिल्ली-सार्वजनिक क्षेत्रातील पाच आजारी उद्योग बंद करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली. सरकारकडे एकूण ६५ आजारी उद्योगांची यादी असून, यामध्ये एअर इंडिया, एमटीएनएल आणि हिंदुस्थान शिपयार्डचा समावेश आहे.
एकेकाळी ज्या कंपनीच्या घड्याळी आणि ट्रॅक्टरने बाजारपेठांवर अधिपत्य गाजविले होते, त्या एचएमटी कंपनीचे तीन युनिट्‌सही बंद करण्यात येणार आहेत, असे अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले. या सर्वच कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती पत्करण्यासाठी सरकारतर्फे विशेष पॅकेजची ऑफर करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तथापि, बंद करण्यात येत असलेल्या अन्य उद्योगांची नावे त्यांनी जाहीर केली नाही.
हवाई आणि मोबाईल दूरसंचार क्षेत्रात कधीकाळी आघाडीवर राहिलेले एअर इंडिया आणि एमटीएनएल सार्वजनिक क्षेत्रातील निकषांनुसार सरकारने आजारी म्हणून जाहीर केले आहेत. सलग चार वर्षातील सकल उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तोटा होत असलेल्या कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील निकषानुसार आजारी म्हणून जाहीर करण्यात येतात.
यावर्षीच्या ३१ मार्चपर्यंत सरकारने आजारी अद्योगांची जी यादी तयार केली आहे, त्यात ६५ उद्योगांचा समावेश आहे. उपक्रमाची स्थिती, त्यांच्यावर असलेले कर्जाचे ओझे, स्रोतांची कमतरता, अतिरिक्त मनुष्यबळ आणि खेळत्या भांडवलाची टंचाई यासारख्या बाबी आजारी उद्योगांबाबत निर्णय घेताना विचारात घेतल्या जातात.