सरकारी संस्थांमध्ये नोकरभरतीवर प्रतिबंध नाही

0
8

राजनाथसिंह यांची राज्यसभेत माहिती
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,-सरकारी संस्थांमध्ये नोकरभरतीवर प्रतिबंध लावणारे कोणतेही आदेश जारी करण्यात आले नसल्याचे बुधवारी सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. सरकार नवीन नोकर्‍या निर्माण करण्यास प्राधान्य देत असल्याने नोकरभरतीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आणि सरकारी संस्थांमध्ये नोकरभरतीवर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते. आमची योजना जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्याची आणि बेरोजगार युवकांची संख्या कमी करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. गुंतवणुकीच्या माध्यमातून देशात सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. १२ व्या पंचवार्षिक योजनेत गैरकृषी क्षेत्रात पाच कोटी नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, तेवढ्याच प्रमाणात युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या राष्ट्रीय उत्पादन परिषदेने देखील २०२२ पर्यंत देशात १० कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. प्रमुख क्षेत्रात रोजगाराच्या संधीत वाढ होत असल्याचे आणि २००९-१० या वर्षाच्या तुलनेत २०११-१२ मध्ये रोजगारात अल्प वाढ झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.