उत्तरप्रदेश बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार

0
18

लखनौ, दि. ८ – बहुजन समाज पार्टीचे विधानपरीषदेतील ८ आमदारांचा कालावधी पुढील महिन्यात संपत असल्याने बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार आहे. समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेशात आखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळवले होते. विधानसभेत बहुमत असताना विधानपरीषदेत बहुमत सिध्द करताना आखिलेश यादव यांच्या सरकारला बसपाच्या आमदारांचा मोठा अडथळा येत असत. परंतू आता अनेक विधेयक पारीत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उत्तरप्रदेश विधानपरीषदेतील एकूण संख्या १०० असून बसपाचे सर्वाधिक ५४ आमदार सभागृहात होते. परंतू आता ही संख्या ४६ वर येणार आहे. बसपानंतर समाजवादी पार्टीचे २६ आमदार असून त्यांची संख्या वाढणार आहे. विधानपरीषदेत भाजपाचे ७, काँग्रेसचे २, शिक्षक संघाचे ५, अपक्ष ४ आणि आरएलडीच्या एका आमदारांचा समावेश आहे. पुढील मे महिन्यात कालावधी संपत असलेल्या आमदारांमध्ये कमलकांत गौतम, गोपाल नरीन मिश्रा, नौशाद अली, अल तोमर, मेधराज सिंग, रामचंद्र सिंग प्रधान, विनय शाक्य आणि शिवबोध राम या बसपाच्या आमदारांचा समावेश आहे.