भाजपने आयोगाला दिलाच नाही निवडणूक खर्चाचा तपशील

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा कोणत्याही प्रकारचा तपशील भाजपने निवडणूक आयोगाला दिलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ५१६ कोटी रुपये खर्च केले आहेत, तर सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने फक्त १८कोटी रुपये खर्च केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीसाठी ४१ कोटी रुपये खर्च आला आहे. अर्थात काँग्रेसच्या खर्चामध्ये हरियाणामधील निवडणुकीचाही समावेश आहे. मात्र स्वाभाविकपणे एकूण खर्चामधील मोठा वाटा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ता
मिळविणा-या भारतीय जनता पक्षाने निवडणूक खर्चाची माहितीच आयोगाला सादर केलेली नाही. निवडणूक खर्चाची माहिती आयोगाला सादर करण्याची मुदत ४ फेब्रुवारी होती.निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. या चार मुख्य पक्षांव्यतिरिक्त मनसेने जवळपास ५ कोटी बहुजन समाज पक्षाने १८.७२ कोटी आणि माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १.२७ कोटी रुपये खर्च केल्याचे आढळून आले. उमेदवारांवर खर्चाचे बंधन असले तरी पक्षावर तसे कोणतेही बंधन नसते. फक्त खर्चाचा तपशील सादर करण्याचे बंधन पक्षांवर असते. मात्र, हे बंधन बहुतेक वेळा कोणी पाळतच नसल्याचा अनुभव आहे.
वार्षिक ऑडिटदेखील नाही
देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने २०१३-१४ या वर्षाचा आर्थिक लेखा परीक्षण अहवालही आयोगाला सादर केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने विलंबानंतर का होईना अहवाल जमा केला आहे. त्यानुसार त्या वर्षात पक्षाला ५५.४२ कोटी रुपये मिळाले, तर ३५.९४ कोटी रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.