AAP मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता

0
8

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पक्षातील नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा विश्वास गमावून बसले आहेत, असा दावा आपमधील बंडखोर नेत्यांनी केला आहे. आपमधील बंडखोरांनी 14 एप्रिल रोजी गुडगावमध्ये स्वराज संवाद या नावाने बैठक आयोजित केली आहे. आपच्या सुमारे 40 टक्के लोकांचा केजरीवाल यांच्यावर विश्वास नाही, असा दावा बैठकीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅम्पेनमध्ये करण्यात आला आहे.
बंडखोर गटाने सांगितले आहे, की स्वराज संवाद या बैठकीसाठी सुमारे 4200 कार्यकर्त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरले आहेत. त्यात त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. यातील सुमारे 43 टक्के लोकांनी आपमधील बंडखोरांनी नवीन पक्ष सुरु करावा असे सुचविले आहे. केवळ 4 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला आहे तर 5 टक्के लोकांनी कोणतेही मत मांडलेले नाही. यात दिल्लीच्या 1214, उत्तर प्रदेशच्या 775, हरियाणाच्या 405, बिहारच्या 355 आणि महाराष्ट्राच्या 220 लोकांनी भाग घेतला होता. या राज्यांसह काही इतर राज्यांतील लोकांनीही मत व्यक्त केले आहे.