राजस्थानमध्ये 3 दलितांना टॅक्टरखाली चिरडले

0
12

वृत्तसंस्था
अजमेर दि. १६- जमिनीच्या वादातून राजस्थानमधील नागौरमध्ये दलित आणि जाट समुदायात रक्तरंजीत संघर्ष उडाला आहे. यावेळी जाट समुदायाच्या काही लोकांनी दलितांच्या अंगावर टॅक्टर चालविल्याने 3 दलितांचा मृत्यू झाला आहे. यावेळी महिलांसोबत असभ्य वर्तन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या संघर्षात एकूण चार लोकांना मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी एकूण 200 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. राजस्थानचे गृहमंत्री गुलााबचंद्र कटारिया यांनी सांगितले, की दोषींना लगेच पकडता येईल अशी जादूची कांडी आमच्याजवळ नाही.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांवरही जाट समुदायाच्या लोकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर रुग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी दलित समाजाच्या लोकांनी केली आहे. यावेळी आरोपी पु्न्हा हल्ला करु शकतात अशी त्यांना भीती वाटत आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सांगितले आहे, की आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागौरच्या डांगावास गावात गुरुवारी 23 बीघा जमिनीच्या वादावर पंचायत बोलविण्यात आली होती. याचा बुलावा घेऊन गेलेल्या युवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या जाट समुदायाच्या लोकांनी टॅक्टरखाली चिरडून 3 दलितांना ठार मारले. यानंतर हा वाद वाढत गेला. यावेळी महिलांसोबत असभ्य वर्तन करण्यात आले. यावेळी हल्ल्यात ठार झालेल्या एका व्यक्तीचे डोळे लाकडाने फोडण्यात आले.