दीड वर्षात देशात मुबलक दारूगोळा – पर्रीकर

0
4

नागपूर दि. १८ –- 2014 मध्ये दारूगोळ्याबाबत जी स्थिती होती, ती आता नाही. सद्यस्थितीत देशाकडे पुरेसा दारूगोळा असून पुढील दीड वर्षात मुबलक दारूगोळा राहील, असा विश्‍वास आज केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे व्यक्त केला.संरक्षण विभागाकडे अडकलेल्या शहरातील जागा तसेच मिहानला जागा हस्तांतरणाबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर ते रविभवनात पत्रकारांसोबत बोलत होते.
2013 मध्ये “कॅग‘च्या अहवालात देशाच्या संरक्षणासाठी दारूगोळा अपुरा असल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी देशातील दारूगोळ्याची स्थिती स्पष्ट केली. पर्वतांच्या सुरक्षेसाठी (माउंटेन केअर इस्टॅब्लिशमेंट) 87 कोटींची गरज होती. मागील सरकारने याबाबत निर्णय घेतला होता; परंतु पैसा नव्हता. आता पैसा व पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता काटकसर करून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. विमाने खरेदी करण्याची जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) पद्धत योग्य असल्याचेही ते म्हणाले. जीटूजीबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “मिहान‘ला संरक्षण विभागाची 278 एकर जागा देण्याचा करार झाला आहे. त्या मोबदल्यात राज्य सरकार नजीकचीच चारशे एकर जागा एअरफोर्ससाठी देईल. एअरफोर्समधील हेलिकॉप्टर युनिट लगेच हलविता येणार नाही. नक्षलग्रस्त भागावर नियंत्रणासाठी हे युनिट आवश्‍यक आहे. अन्यथा गोरखपूरवरून नियंत्रण ठेवावे लागेल, ते परवडणारे नाही. त्यामुळे मिहानला दिलेल्या जागेत ते युनिट सध्या कायम राहील. मिहानला या जागेची गरज पडेल, तेव्हा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.