तुमसर तहसीलदारांचे तडकाफडकी स्थानांतरण

0
11

तुमसर दि. १८ –: तालुक्यातील सिंदपुरी येथील तलाव फुटून अनेक घरे क्षतिग्रस्त झाली होती. नुकसानग्रस्तांना मदतीसंदर्भात पंचायत समित सभापती व तहसीलदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. या वादात अखेर तहसीलदार यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील तहसीलदार रुजू होत असल्याची माहिती आहे.
सिंदपुरी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे अनेक घरे क्षतिग्रस्त झाली होती. संपूर्ण गाव येथे वाहून जाण्याची भीती होती. प्रसंगावधान ओळखून पंचायत समिती सभापती कलाम शेख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने दुसरीकडील पाळ फोडून पाणी वळविले होते. या प्रकरणात महसूल प्रशासनाने ५२ घरांचा सर्व्हे केला होता. अनेक घरांना तडे जाऊन घरे जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. शासकीय मदत तोकडी पडत असतांनी राज्य शासनाला अहवाल पाठविण्यास विलंब करण्यात आला. यावरुन सभापती कलाम शेख व तहसीलदार सचिन यादव यांच्यात शाब्दीक चकमक झाली होती.
या प्रकरणाची तक्रार राज्याच्या महसूल मंत्र्यांना करण्यात आली महसूल मंत्र्यांनी दखल घेऊन तहसीलदार यादव यांची उचलबांगडी केल्याचे समजते. त्यांच्या जागी पूर्वी लाखांदूर व सध्या मूल येथील तहसीलदार डी. सी. सोनवाने रुजू होत असल्याची माहिती आहे.
तहसीलदार सचिन यादव तुमसर येथे ३० मार्च २०१४ ला रुजू झाले होते. केवळ १ वर्ष २ महिने इतकी कमी वेळ त्यांची कारकिर्द राहिली. एक सक्षम, कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून त्यांची ओळख होती. सिंदपूरी प्रकरण त्यांना भोवले अशी चर्चा शहर व तालुक्यात आहे.