BSNLची फ्री रोमिंगची आज घोषणा

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. २- सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आज (मंगळवार) रोमिंग चार्ज संपुष्टात आणण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद याची घोषणा करतील. बीएसएनएलने नुकतीच त्यांच्या रोमिंग टेरिफमध्ये 40% कपात केली होती. बीएसएनएलने हे नवे पाऊल उचलले तर कंपन्यांमध्ये प्राईज वॉर सुरु होण्याची शक्यता आहे. बीएसएनएल रोमिंगसह ग्राहकांना आणखी एक सुविधा देण्याची शक्यता आहे. ती म्हणजे मोबाइलच्या माध्यमातून पैसे काढण्याची. त्यासाठी ग्राहकांना नेट बँकिंगची गरज पडणार नाही.
काय आहे योजना
बीएसएनएलचे ग्राहक त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा रकमेचा एक भाग, जो बँकिंग नियमांप्रमाणे ग्राह्य असेल, तो आपल्या मोबाइलच्या एम-वॉलेटमध्ये जमा करु शकतील. त्यानंतर जर ग्राहकाला पैशांची गरज भासली तर त्यांना कोणत्याही बँकेत अथवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. बीएसएनएल ग्राहक जवळच्या रिटेलरकडे जाऊन पैसे घेऊ शकेल.
कसा आहे फायदा
रात्रीच्या वेळी किंवा एटीएम नाही अशा ठिकाणी जवळच्या रिटेलरकडे जाऊन बीएसएनएल ग्राहक पैसे घेऊ शकतात. सध्या एका व्यक्तीचे पैसे दुसऱ्याला पाठवण्याची सुविधा मोबाइल कंपन्या देत आहेत. मात्र स्वतःच्या मोबाइलमध्ये पैसे जमा करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा ते काढणे, अशी सुविधा बीएसएनएल प्रथमच लॉन्च करत आहेत.

कमिशन देण्याची गरज नाही
बीएसएनएलचे सीएमडी अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले, की या योजनेंतर्गत एका निश्चित रकमेसाठी ग्राहकांना कमिशन देण्याची गरज पडणार नाही. हे कमिशन रिटेलरला बँकेकडून दिले जाईल. एका अधिकाऱ्याने या योजनेविषयी सांगितले, ‘जेव्हा ग्राहक रिटेलरकडे जाईल तेव्हा संबंधित रिटेलर ग्राहकाच्या एम-वॉलेटमधील रक्कम स्वतःच्या एम-वॉलेटमध्ये ट्रांसफर करेल आणि त्यानंतर रोख रक्कम ग्राहकाला देईल.’
ही योजना सध्या आंध्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय या बँकेच्या ग्राहकांनाच मिळणार आहे. हळुहळु इतरही बँकांना या योजनेशी जोडून घेतले जाईल आणि त्यांच्या ग्राहकांनाही योजनेचा लाभ घेता येईल.