बांगलादेश दौ-यासाठी टीम इंडीयाचे प्रशिक्षकपदी रवी शास्त्री

0
10

नवी दिल्ली दि.२- – भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौ-यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार रवी शास्त्री यांची नियुक्ती केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शास्त्रीचे नाव सुचवले. बांगलादेश दौरा १० जूनपासून सुरू होणार आहे.
रवी शास्त्री सध्या मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. बांगलादेश दौ-यानंतर कायमस्वरुपी प्रशिक्षकांची निवड करण्यात येईल, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
बीसीसीआयने सोमवारी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समितीवर निवड केली होती. त्यानंतर मंगळवारी रवी शास्त्री यांच्याकडे हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असलेल्या डंकन फ्लेचर यांचा करार संपुष्टात आला आहे. बीसीसीआयने त्यांच्या करारात वाढ केलेली नाही.
भारतीय संघ बांगलादेश दौ-यात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. शास्त्रीने भारतासाठी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळले. यात १९८० मधील विश्वचषकाचा समावेश आहे.
२००७ मध्ये भारताचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याशी झालेल्या वादामुळे बांगलादेश दौ-यात शास्त्रीने व्यवस्थापकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली.