शोधनिबंधातून सोडविणार विदर्भातील बेरोजगारी

0
11

‘व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन’चा उपक्रम
अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपविणार?
नागपूर दि. २: विदर्भात उच्चशिक्षित युवक असताना नोकर्‍यांसाठी विदर्भातील युवकांची निवड होत नाही. याबाबतच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. ‘विदर्भातील युवकांपुढील बेरोजगारी व करिअर निर्मितीतील समस्या’ या विषयावर लघू शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
ग्लोबलायझेशनच्या युगात विदर्भातील युवक मागे का? याची कारणमीमांसा शोधनिबंधात करावी लागणार आहे. निबंध इनोव्हेटिव्ह, शास्त्रीय आधार, व्यवहार्यता आणि परिणामकारकता या शोधनिबंधात राहणार आहे. बेरोजगारी व करिअर घडविण्यामागील अडचणीची प्रमुख १0 कारणे, त्याचे थोडक्यात विश्लेषण आणि उपाययोजना या निबंधात असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. १८ ते ३0 वयोगटातील युवक-युवतींना या शोधनिबंध स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्राप्त शोधनिबंधाला २१ हजार रुपये रोख, दुसरे पारितोषिक १५ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक १0 हजारांचे आहे. चांगल्या १0 शोधनिबंधाला प्रत्येकी ५ हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. यातील निवडक निबंधांचा समावेश एका विशेष अहवालात करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट १00 शोधनिबंध लिहिणार्‍या युवकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत निबंध लिहिण्याची मुभा राहणार आहे. शोधनिबंध पाठविण्याची अंतिम तारीख १५ जून आहे. पत्रपरिषदेला फाऊंडेशनचे सचिव मनोज चव्हाण, कोषाध्यक्ष डॉ. योगिता कस्तुरे, संचालक प्रफुल्ल रेवतकर, रावलीन खुराणा, आनंद कजगीकर, सचिन मुकेवार, विजय भोपचे, सचिन पुनियानी, डॉ. सुजाता दमके आणि गौरव टावरी उपस्थित होते.