सुषमा स्वराज यांनी केली होती ललित मोदींची मदत ?

0
16

नवी दिल्ली, दि. १४ – आयपीएलचे पहिले आयुक्त ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे समोर आल्याने मोदी सरकारची कोंडी झाली आहे. सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा दावा केला जात आहे.

२०१३ मध्ये सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असताना त्यांनी ललित मोदींची मदत केल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केला आहे. ब्रिटनमधील विद्यापीठात नातेवाईकाला प्रवेश मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी ललित मोदींची मदत घेतली होती. या मदतीच्या मोबदल्यात स्वराज यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून ललित मोदींना मदत केल्याचा दावाही केला जात आहे. ललित मोदी हे परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी फरार असून ईडीने त्यांना नोटिसही बजावली होती. त्यामुळे भारताने फरार घोषीत केलेल्या व्यक्तीला मदत केल्याने सुषमा स्वराज गोत्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे परराष्ट्र मंत्रीपदावर विराजमान झाल्यावरही सुषमा स्वराज या ललित मोदींच्या संपर्कात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

ललित मोदींना मदत केल्याच्या आरोपांवर सुषमा स्वराज यांनी ट्विटरव्दारे स्पष्टीकरणही दिले आहेत. स्वराज म्हणाल्या, गेल्या वर्षी जुलैमध्ये ललित मोदींनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या पत्नीला उपचारासाठी पोर्तुगालला जायचे होते. यासाठी संमती पत्रावर स्वाक्षरी देण्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती असे स्वराज यांनी म्हटले आहे. ललित मोदी यांना भारतात परतण्यासही स्वराज व त्यांच्या पतीने मदत केल्याचे उघड झाले आहे.

ललित मोदींना ब्रिटनकडून ट्रॅव्हल डॉक्यूमेंट मिळणे गरजेचे होते. युपीए सरकारच्या एका परिपत्रकामुळे ब्रिटन प्रशासनाने मोदींना ट्रॅव्हल डॉक्यूमेंट देण्यास नकार दिला होता. यामुळे ब्रिटन – भारत संबंधावर परिणाम होईल असे ब्रिटन सरकारने म्हटले होते. ललित मोदींना माणुसकीच्या दृष्टीकोनातून मदत करणे गरजेचे होते असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणानंतर सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.