मदर तेरेसांचा वारसा चालवणा-या सिस्टर निर्मला यांचे निधन

0
13

कोलकाता, दि. २३ – नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालवणा-या व मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. ‘ सिस्टर निर्मला यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. कोलकाता व संपूर्ण जग त्यांना सदैव स्मरणात ठेवेल’ असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
‘ सिस्टर निर्मला यांचे संपूर्ण आयुष्य सेवेत गेले, गरीब व वंचितांची काळजी घेणा-या निर्मला यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले आहे’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सिस्टर निर्मला यांचा जन्म १९३४ साली झारखंडमध्ये झाला. पाटणा येथे ख्रिश्चन मिशनरीजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १९९७ साली मदर टेरेसा यांचे निधन झाल्यानंतर त्या मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुखपदी रुजू झाल्या व त्यांनी ती धुरा समर्थपणे सांभाळली. समाजातील गरीब व गरजू जनतेला त्यांनी आपलसं केलं. २००९ साली केंद्र सरकारकडून त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.