रा. सू. गवई कालवश

0
9

नागपूर (वृत्तसंस्था), दि.25 – गेल्या सहा दशकांपासून आंबेडकरी चळवळीचे अग्रदूत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, माजी राज्यपाल व महाराष्ट्र विधान परिषदेतील माजी सभापती रामकृष्ण सूर्यभान गवई (वय 86) यांचे आज नागपुरातील श्रीकृष्ण हॉस्पीटलमध्ये दुपारी एक वाजून 50 मिनिटांनी निधन झाले.

प्राप्त माहितनुसार, गवई यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर येछे त्यांचेवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मागे पत्नी डॉ. कमलताई, पुत्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई आणि डॉ. राजेंद्र गवई, मुलगी कीर्ती मेश्राम असा परिवार आहे.

रा. सू. गवई यांचा जन्म 30 ऑक्‍टोबर 1929 रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्‍यातील दारापूर येथे झाला. एलएलबीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 1952 पासून, म्हणजे विद्यार्थिदशेपासून ते आंबेडकरी चळवळीत राहिले. “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया‘चे ते अखेरपर्यंत अध्यक्ष राहिले. संसदपटू, उत्तम संघटक आणि कुशल नेतृत्व क्षमतेचा अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

धम्मदीक्षेचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असतानाच गवई यांची 17 जून 2006 रोजी बिहारच्या राज्यपालपदी निवड झाली. 23 जून रोजी राज्यपाल म्हणून शपथविधी झाला. बिहारसारख्या महत्त्वपूर्ण राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. केरळ व सिक्कीमच्या राज्यपालपदांची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

दीक्षाभूमीवरील स्मारकाचे शिल्पकार
नागपूरची दीक्षाभूमी आंबेडकरी समाजाचा मानबिंदू आहे. भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांच्या निधनानंतर 1969 मध्ये रा. सू. गवई यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षपद आले. तेव्हापासून दीक्षाभूमीवर स्मारकाच्या निर्माण कार्याला सुरवात झाली. त्यांच्यामुळे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे प्रेरणादायी अद्वितीय असे स्मारक उभे राहिले. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 1992 मध्ये स्मारकाचे उद्‌घाटन झाले.