दीपक आत्रामांच्या काँग्रेस प्रवेशाला कार्यकर्ते, नेत्यांचा विरोध

0
9

गडचिरोली दि.१०:अहेरीचे माजी अपक्ष आमदार तथा आदिवासी विद्यार्थीसंघाचे अध्यक्ष दीपक आत्राम यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात हालचाली सुरूझाल्या होत्या. मात्र त्यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाला अहेरी विधानसभा मतदार संघातील शेकडो जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
गेल्या तीन-चार दिवसात कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई स्थित टिळक भवनात या संदर्भात तारेने आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना कळविल्या आहे. गेल्या २0 वर्षांपासून या भागात काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक काम आम्ही कार्यकर्ते करीत आहो. आमच्या आजोबा-पणजोबांपासून काँग्रेस पक्षाची धुरा कुटुंबांनी सांभाळून ठेवली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणार्‍या दीपक आत्राम यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असेल, तर ही अतिशय दुर्दैवाची बाब ठरेल. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षo्रेष्टीने एकतर्फी निर्णय घेऊ नये, जिल्ह्यातील जुन्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीमाजी खा. मारोतराव कोवासे यांनीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी खा. कोवासे यांनीही माजी आ. दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाला स्पष्ट शब्दात विरोध केला, अशी माहिती मिळाली आहे. कोवासे यांनी खा. अशोक चव्हाण यांना गडचिरोली जिल्ह्यात काही ठरावीक लोकांकडे काँग्रेसचे मांडलिकत्व ठेवू नका, सर्वांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या, अशी भावना व्यक्त केली, अशी माहिती मिळाली आहे. सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, आलापल्ली आदी भागातून शेकडोच्या संख्येने तार व पत्र दीपक आत्राम यांचा काँग्रेस प्रवेश होऊ नये, म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वातावरण तापले असून माजी खा. मारोतराव कोवासे यांनाही या विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी याबाबत पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.