अखेर ‘त्या’ दारू दुकानाला ठोकले सील

0
11

राजेंद्र फुलबांधे
पवनी दि.१०: मागील चार वर्षांपासून खैरी दिवाण येथील दारुचे दुकान बंद करण्यात यावे या मागणीसाठी महिलांचा लढा सुरू होता. मद्य सेवनाने अनेकांचे संसार उदध्वस्त झाल्यामुळे महिला दारूबंदीविरुद्ध पेटून उठल्या. त्यासाठी गावातील शेकडो महिलांनी गांधीगिरी मार्गाने दारू दुकान बंद करण्याकरीता आंदोलन करीत होत्या. अखेर मंगळवारला रात्री या दारू दुकानाला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले. त्यामुळे मागील चार वर्षापासून सुरूअसलेल्या महिलांच्या लढय़ाला यश आले आहे.
२६ जानेवारी २0११ रोजी ग्रामसभेत रमादेवी रेड्डी यांना दारू विक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. त्यामुळे गावात असंतोष निर्माण झाला होता. या दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे हे दुकानच हटविण्याकरिता महिला व पुरूष एकवटले होते.
२४ डिसेंबर २0१२ रोजी भजन आंदोलन करण्यात आले. २६ जानेवारी २0१३ रोजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे, ई-मेल पाठविले. याची शासनाने दखल घेत तत्कालीन ग्रामसेवक आर.डी. मेश्राम यांना निलंबित करण्यात आले व तत्कालीन सरपंचाविरुद्ध कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात आली.
दारूबंदी प्रकरण मंत्रालय ते न्यायालय असा प्रवास करून हे आंदोलन अयशस्वी ठरले. तरीही खचून न जाता येथील महिला, पुरूष व कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे दुकान हटवायचे असा निर्धार केला. १२ महिन्यानंतर गावातील शेकडो महिलांच्या निवेदनानंतर ग्रामपंचायतने २0 एप्रिल २0१५ रोजी विशेष महिला ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत गावातील ३५८ म्हणजेच ६0 टक्के महिलांनी दारू दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. हा ठराव जिल्हाधिकार्‍यांकडे जाण्यापूर्वी न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती. २८ ऑगस्ट २0१५ ला हा स्थगनादेश रद्द झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने अपील खारीज केला. त्यानंतर नागपूर खंडपिठात अपील दाखल करून न्यायालयाने ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत स्थगनादेश दिला. ३ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने हे प्रकरण खारीज केल्यामुळे देशी दारू दुकान बंद करण्याचा मार्गमोकळा झाला.
जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त यांनी आदेश जारी करून उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी.पी. पटले हे खैरी दिवान येथे येऊन मंगळवारला रात्री देशी दारू दुकानाला सील ठोकले.या आदेशाची प्रत सरपंच अनिता कुलकर यांना देण्यात आली. या आंदोलनात सुरुवातीपासून अनिल मेंढे, राजेंद्र फुलबांधे, हरीश तलमले, सरपंचा अनिता कुल्लरकर, महिला समितीच्या अध्यक्षा उषा हटवार, पुरूषोत्तम तेलमासरे, नीळकंठ सेलोकर, सुखदेव हटवार, वामन मोहरकर, अंबरदास धनविजय, मुरलीधर पंचभाई यांच्यासह गावातील महिला, पुरूष, युवक, युवती आदींनी सहकार्य केले.