नक्षल्यांनी पेरमिली येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय जाळले

0
6

गोंदिया, दि.१०: सशस्त्र नक्षल्यांनी काल(दि.९) अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत दुर्गापूर ग्रामपंचायत जाळून टाकली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान नक्षल्यांनी दुर्गम भागात पत्रके टाकून कोंडेकल येथील चकमकीच्या निषेधार्थ आज धानोरा तालुका बंदचे आवाहन केल्याची माहिती आहे.
पेरमिली हे गाव आलापल्ली-भामरागड मार्गावर असून, ते मोठया लोकवस्तीचे गाव आहे. गावात पोलिस मदत केंद्र, आश्रमशाळा, मंडळ अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व अन्य कार्यालये आहेत. काल रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी पेरमिली येथे जाऊन वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील फर्निचर व कागदपत्रांना आग लावली. या आगीत संपूर्ण फर्निचर व दस्तऐवज जळून खाक झाले. विशेष म्हणजे नक्षल्यांनी कार्यालयात गोळा करुन ठेवलेले वनोपजही जाळून टाकले. दक्षिण टोकावर ही घटना सुरु असताना धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत दुर्गापूर येथील ग्रामपंचायतही नक्षल्यांनी जाळून टाकली. ग्रामपंचायतीमधील फर्निचर व कागदपत्रे आगीत जळाल्याचे वृत्त आहे. दरम्यान नक्षल्यांनी घटनास्थळी व अन्य भागात पत्रके टाकून कोंडेकल चकमकीच्या निषेधार्थ धानोरा तालुका बंदचे आवाहन केले आहे. ३ सप्टेंबरला गट्टा(फुलबोडी) पोलिस मदत केंद्रांतर्गत कोंडेकल गावानजीक झालेल्या चकमकीत २ नक्षली ठार झाले होते, त्यात कंपनी क्रमांक ४ च्या एका सेक्शन कमांडरचाही समावेश होता. या घटनेमुळे नक्षलवादी खवळले असून, त्यांनी आता हिंसक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, पेरमिली व दुर्गापूर येथील जाळपोळीमागे नक्षल्यांचा हात आहे की आणखी कुणाचा, हेही तपासून पाहणे महत्वाचे ठरणार आहे.