हे ‘फसवणूक’ सरकार- धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

0
5

मुंबई,दि.२९- राज्यात फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून या सरकारची वर्षपूर्ती ही जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दहा महिन्यांच्या काळातच या सरकारनं राज्यावर 54 हजार कोटींचं कर्ज लादलं. पेट्रोल-डिझेल कराच्या माध्यमातून सर्वच वाहनांवर ‘टोल’ लावला. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचं भलं केलं, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीऐवजी सावकारांची कर्जमुक्ती साधली. वृत्तपत्रांच्या मथळ्यात राहण्यात धन्यता मानत असलेलं हे सरकार जनतेच्या मनातून सपशेल उतरलं आहे, असेही मुंडे म्हणाले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जनता आत्महत्या करीत आहे. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. असं असताना शासनाच्या वर्षपूर्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील युती सरकारच्या गेल्या वर्षभरातील कारभाराचे वाभाडे काढले.