संघटनात्मक निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घ्या – प्रदेशाध्यक्ष खा. दानवे

0
4

मुंबई -दि.१८-भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून सर्वांशी चर्चा करून सहमतीने चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी केले.

भाजपाच्या विशेष प्रदेश बैठकीत मार्गदर्शन करताना मा. रावसाहेब पाटील दानवे बोलत होते. यावेळी प्रदेश सहप्रभारी खासदार राकेशसिंह, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजयाताई रहाटकर, पक्षाचे राजस्थान सहप्रभारी खासदार गोपाळ शेट्टी व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

मा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, संघटनात्मक निवडणुकीत सर्वांशी चर्चा होणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका पार पाडणे गरजेचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यालय तयार करायचे आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम चालू आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा आहे.

खासदार राकेशसिंह म्हणाले की, भाजपा निश्चित विचारसरणीच्या आधारे काम करणारा पक्ष आहे. वैचारिक बळामुळेच आज भाजपा सर्वत्र यशस्वी होत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार चांगले काम करत आहे. राज्यात कल्याण – डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे काहीशी नाराजी असली तरी कार्यकर्त्यांनी निराशा झटकून आता नव्या उत्साहाने कामाला लागण्याची गरज आहे.

मा. व्ही. सतीशजी म्हणाले की, भाजपाच्या केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे काम चांगले चालू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या शक्तीचे प्रकटीकरण होत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न चालू आहेत. किरकोळ मुद्द्यांवरूनही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा प्रतिकार आपण कसा करू शकू, याचा विचार करण्याची गरज आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर विक्रम तरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्या महापालिकेतील पक्षाच्या यशाबद्दल खासदार कपिल पाटील व आमदार मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार करण्यात आला. प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहिली. प्रदेश सरचिटणीस आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सूत्रसंचालन केले.