अर्जुनी मोरगाव तालुक्यात महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी

0
43

अर्जुनी-मोर,दि.11-उत्तरप्रदेशातील लखिंपुर येथील घटनेचा निषेध करून दोषींना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अर्जुनी-मोर तालुक्यातील कडकडीत बंद पाळण्यात आला.तालुक्यातील अर्जुनी शहर,केशोरी,महागाव, नवेगावबांध,इटखेडा, बोंडगावदेवी,शिरोली व इतर गावातील बाजार पेठा बंद होत्या.तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या. अकरा वाजता तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्जुनी-मोर येथील दुर्गा चौकात एकत्र येऊन लखिंमपुर घटनेचा निषेध नोंदवत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन केले.यावेळी झालेल्या सभेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे, रत्नदीप दहिवले, अर्जुनी-मोर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे, अर्जुनी-मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, राष्ट्रवादीचे यशवंत परशुरामकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल, अश्विन गौतम, चेतन दहीकर,माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,अनिल दहिवले यांनी घटनेचा निषेध नोंदवत दोषीला फाशी व्हावी अशी मागणी केली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत सरकार द्वारे पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी उत्तर प्रदेशातील लखिंपुर येथे शांततापूर्ण आंदोलन करीत असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी लखिंपुर येथील घटनेला जबाबदार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना त्वरित फाशी देण्यात यावी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा, यावर केंद्र शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन अर्जुनी-मोर उपविभागीय अधिकारी अवतारे यांनी स्विकारले.यावेळी महा विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहेंदळे तर आभार प्रदर्शन राकेश रंजन यांनी केले.