खा.अशोक नेते भाजपचे नवे गडचिरोली जिल्हाध्यक्ष

0
13

गडचिरोली, दि.१६: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक धुरंधरांच्या नावांची चर्चा सुरु असताना आज  खा.अशोक नेते यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते खा.नेते यांची निवड झाल्याचे जाहीर करुन सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यात आला.

यापूर्वीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्या जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. या पदासाठी प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रवींद्र ओल्लालवार, मोतीलाल कुकरेजा व नंदकिशोर काबरा यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपच्या अंतर्गत गोटात सर्वाधिक चर्चा नंदकिशोर काबरा यांच्या नावाची होती. परंतु काबरा हे खा.अशोक नेते यांच्याच गोटातील असल्याने कुठलेही अन्य नाव येऊ नये म्हणून खा. नेते यांचे नाव सुचविण्याचे ठरले. त्यानुषंगाने आज सर्किट हाऊसमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीला निरीक्षक म्हणून भंडारा येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रकाश मालगावे उपस्थित होते. शिवाय गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आरमोरीचे आ.क्रिष्णा गजबे, मावळते जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, रेखा डोळस, प्रतिभा चौधरी यांच्यासह पक्षाचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. किशन नागदेवे यांनीच खा.अशोक नेते यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविले. त्यानंतर कुणाचेही नाव आले नाही. आ.डॉ.होळी व आ.क्रिष्णा गजबे यांनी खा. नेते यांच्या नावाला अनुमोदन दिले. त्यानंतर निरीक्षक डॉ.मालगावे यांनी खा.अशोक नेते यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.