आदिवासींनी हिंदुराष्ट्रपुरस्कर्तेंचे आक्रमण परतावून लावावे-नागेश चौधरी

0
12

गडचिरोली,  दि.१६:: अलिकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. अशावेळी आदिवासींनी संघटित होऊन सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे, असा सूर “आदिवासींची स्थिती व आव्हाने” या विषयावर आयोजित विविध चर्चासत्रांतील मान्यवरांनी काढला.

 माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी सोशल फोरम, बहुजन संघर्ष(पाक्षिक) व अखिल भारतीय आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवन कला दालनात दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आज पहिल्या सत्रात “आदिवासी-सांस्कृतिक-धार्मिक आक्रमणाचा धोका” या विषयावर बहुजन संघर्ष पाक्षिकाचे संपादक नागेश चौधरी यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी आदिवासी महासभेचे अध्यक्ष हिरालाल येरमे हे होते. नागेश चौधरी म्हणाले, हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते नियोजनबद्धरित्या आदिवासींवर सांस्कृतिक आक्रमण करीत आहेत. आदिवासींना वनवासी बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समरसतेच्या माध्यमातून त्यांना विषमताच पेरायची असून, समरसता व समता यांच्यात फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समतेचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी, दलित व ओबीसींनी एकत्रितरित्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहनही नागेश चौधरी यांनी केले. उच्चभ्रू मंडळी आदिवासी, ओबीसींच्या बोलीभाषेला कनिष्ठ लेखतात. मात्र भाषा ही व्यवहाराचे माध्यम आहे. त्यामुळे कुठलीही भाषा कनिष्ठ नसून, बहुजनांनी न समजणाऱ्या भाषेचा विरोध करावा. जातीव्यवस्थेचा बीमोड हीच खरी राष्ट्रवादी भूमिका असून, आदिवासी व अन्य वंचित घटकांनी आपली अस्मिता जागृत करुन त्यासाठी लढा द्यावा, असे आवाहनही श्री.चौधरी यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय भाषणात हिरालाल येरमे म्हणाले, ज्यावेळी हिंदूराष्ट्र निर्मिती होईल त्यावेळी भारतीय संसद नव्हे तर धर्मसंसद सर्वोच्च असेल. हा मोठा धोका आदिवासींंनी ओळखण्याची गरज आहे. एकीकडे संस्कृत विद्यापीेठे निर्माण केली जातात, मग गोंडी विद्यापीठ का निर्माण केले जात नाही, असा सवालही हिरालाल येरमे यांनी उपस्थित केला. दुसऱ्या सत्रात “आदिवासी साहित्य:वाटचाल आणि आव्हाने” या विषयावर पत्रकार राजेश मडावी व समीक्षक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांचे व्याख्यान झाले. राजेश मडावी म्हणाले, प्रस्थापित साहित्यामुळे सुशिक्षित आदिवासींचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे हा समाज आदिवासी साहित्याकडे मोठया आशेने बघायला लागला आहे. निव्वळ कलावादी साहित्याला अर्थ नसून, त्याला वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. साहित्य हे जीवनवादी असावे. अलिकडे वैचारिक गोंधळ वाढल्याचे दिसून येते. बोलीभाषेत लेखन होत नसल्याने व लेखकांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटल्याने कथा व कविता लेखनात अडथळे निर्माण होत आहेत, असेही श्री.मडावी यांनी स्पष्ट केले. आदिवासी साहित्यातही पुराणातील प्रतीके येत आहेत. ही प्रतीके आपण केव्हापर्यंत वापरणार आहोत, नक्षलवादावर एकाही आदिवासी लेखकाने कादंबरी का लिहिली नाही, आदिवासी महिला लेखकांच्या संख्येत वाढ का होत नाही, असे प्रश्न उपस्थित करुन राजेश मडावी यांनी भुजंग मेश्रामांच्या कवितेनंतर काव्यलेखन थांबल्याची खंत व्यक्त केली.

सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.अशोक पळवेकर म्हणाले की, समाज, साहित्य, तत्वज्ञान वेगवेगळे करुन कुठल्याही समुहाच्या जीवनाचा साकल्याने अभ्यास करता येत नाही. तत्वज्ञानाचा गाभा समुहापर्यंत पोहचविण्यासाठी ते लालित्याच्या अंगानेच पोहचवावे लागते. कार्यकर्ता हा प्रथम तत्वाज्ञानाशी जुळतो. त्यामुळे कार्यकर्ता हाच साहित्याचा प्रचारक असतो. पूर्वीच्या आदिवासी साहित्यात व आताच्या साहित्यात बराच फरक आहे. १९६० नंतर झालेले संघर्ष, लोकलढे, त्यानंतर बदललेलं वास्तव साहित्यातून व्यक्त होऊ लागलं. स्वातंत्र्योतर काळात जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासींचे नागरी समुहाशी साहचर्य वाढलीे. आदिवासी माणूस सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ लागला. त्यामुळे साहित्यात त्याच्या बदललेल्या जीवनाचे प्रतिबिंब उमटू लागले. आता हे साहित्य अधिक व्यापक होणे गरजेचे आहे, असेही डॉ.पळवेकर म्हणाले.(साभार गडचिरोली वार्ता)