देशाची व्यवस्था बदलण्याचा डाव – ऍड. प्रकाश आंबेडकर

0
12
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आम्हीच राष्ट्रवादाचे मालक आहोत, असा देखावा करीत आहेत. परंतु, रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणातून त्यांचा खरा चेहरा समोर आला. संसदीय लोकशाहीऐवजी दुसरी व्यवस्था आणायची असल्याचा छुपा अजेंडा खुला झाला. याची पूर्वतयारी म्हणूनच देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप माजी खासदार व भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

रविभवनात ऍड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”सत्तेवर कोणीही असो, सरकार नव्हे, तर नागरिक या देशाचा मालक आहे. राज्यकर्ते सेवक आहेत. परंतु, आरएसएस, भाजपचं धोरण या सेवकांना मालक करण्याचे आहे. नागरिक आणि देश असा फरक कोणी करू शकत नाही. यामुळे घटनेच्या प्रास्ताविकात “आम्ही‘ या शब्दाने सुरवात केली.‘‘ 

रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणात केंद्र शासनाची भूमिका दिशाहीन आहे. पीडीपीचे मुख्यमंत्री मुक्ती मोहंमद सईद यांनी जाहीरपणे अफजल गुरू आमचे हिरो आहेत, असे वक्तव्य केले. असे असताना भाजपने पीडीपीबरोबर हातमिळवणी करीत जम्मू काश्‍मीरचे सरकार स्थापन केले. त्या वेळी अफजल गुरूची चर्चा होत नाही. परंतु, “जेएनयू‘च्या चर्चेत विषय हाताळून विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवले जातात. भाजपने स्वतःचे अपयश लपवण्यासाठी जेएनयूत कन्हैयासह इतर विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त केले, अशी टीकाही त्यांनी केली.