कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग घ्यावा- पालकमंत्री बडोले

0
11

सडक अर्जुनी,दि. २२ : तालुक्यातील कनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच ग्रामस्थांना अंमलबजावणीच्या कार्यात सहभागी करुन घ्यावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

सडक/अर्जुनी तालुक्यातील कनेरी/राम या गावाची निवड पालकमंत्री बडोले यांनी आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कनेरी/राम येथे नुकतीच पालकमंत्री बडोले यांनी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
सभेला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, पं.स. सदस्य लिलाधर हत्तीमारे, सरपंच इंदिरा मेंढे उपस्थित होते. गावातील कोणीही निरक्षर राहणार नाही. यासाठी निरक्षरांचे साक्षरता वर्ग गावात सुरु करावे.
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते तयार करावे असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, पांदण रस्त्यांच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल बाजारपेठेत सहजपणे घेऊन जाणे शक्य होईल. कनेरीत कोणीही बेघर व्यक्ती घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी पंचायत समितीने लक्ष द्यावे. सर्व समाजातील व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे. मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळी देणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, कृषी विभागाने कनेरीच्या शेतीचा कायापालट करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घ्यावी. त्यांना नगदी पिकाकडे वळवावे. शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असेही ते म्हणाले.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आरोग्य विभागाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवाव्यात. खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. शाळेतील सर्व मुले स्कॉलरशिप परिक्षेला पाहिजे याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला केली.
सभेला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. वाकडे, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी मिनाक्षी उन्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बागडे, श्री देशमुख, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कठाडे, तहसिलदार श्री परळीकर, प्रभारी गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, तालुका कृषी अधिकारी पेशट्टीवार, क्रीडा अधिकारी श्री निमगडे यांचेसह जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.