दीड वर्षांत २०९ कोटींची कामे केल्याचा आ.होळी यांचा दावा

0
5

गडचिरोली, : आमदार झाल्यापासूनच्या दीड वर्षांत आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सुमारे २०९ कोटींची विकासकामे केल्याचा दावा आ.डॉ.देवराव होळी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

वर्षपूर्तीनिमित्त आ.डॉ.देवराव होळी यांनी काढलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन खा.अशोक नेते यांच्या हस्ते विश्रामगृहात करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रवींद्र ओल्लालवार, जि.प.सदस्य प्रशांत वाघरे, अनिल पोहनकर, प्रतिभा चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आ.डॉ. होळी यांनी पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात रस्ते व पूल बांधकामासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. “२५१५” शीर्षक व दलित वस्ती योजनेंतर्गत प्रत्येकी १ कोटी, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत ३ कोटी, आमदार निधीतून साडेतीन कोटी, जलयुक्त शिवार योजनेसाठी ३ कोटी, मानव विकास मिशनसाठी ६ कोटी, “५०५४” शीर्षकांतर्गत आदिवासी योजनेसाठी ५ कोटी, सर्वसाधारण ५०५४ योजनेंतर्गत २ कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरी योजनेसाठी १ कोटी, विशेष कृती आरखडयांतर्गत अतिसंवेदनशील क्षेत्रासाठी ३ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रासाठी ३ कोटी, “३०५४” शीर्षकांतर्गत सर्वसाधारण उपयोजनेसाठी ३ कोटी, “३०५४” शीर्षकांतर्गत आदिवासी उपयोजनेसाठी ३ कोटी, सिंचनविषयक कामांसाठी ५ कोटी, पाणीपुरवठा योजनांसाठी ७ कोटी व इतर विकासकामांसाठी ५० कोटी असा एकूण २०९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, काही कामे पूर्ण झाली, तर काही सुरु असल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी यांनी दिली.