पूर्णा पटेल आज कार्यकर्त्यांमध्ये जागविणार नवचेतना

0
8

गोंदिया दि.३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक आज गुरूवारला (दि.३) गोंदिया शहर व गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील विशाल लाॅन येथे होणार आहे. पूर्णा प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी या बैठकी होणार आहेत.विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पुर्णा पटेलांच्या माध्यमातून जनतेत जाण्याचा निर्णय प्रफुल पटेलांनी घेतला आहे.यापुर्वीही पुर्णा पटेल यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती.आता निवडणुका नसताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्मध्ये नवचेतना फुलवण्यासाठी घेतलेला पुढाकार ही जिल्ह्यातील नव्या राजकीय पर्वाची सुरवात म्हणावी लागणार आहे.

दुपारी २ वाजता निवासस्थान बगिचा, रामनगर येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर युवक राष्ट्रवादी व शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी ४.३० वाजता गोंदिया तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुडवा येथे मार्गदर्शन करणार आहे. यात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर उपस्थित राहतील.

४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आ. राजेंद्र जैन यांनी निवड केलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील आदर्श ग्राम डव्वा येथे वाचनालयाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासोबतच दुपारी २ वाजता नवेगावबांध येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक व सत्कार कार्यक्रमाला पूर्णा पटेल उपस्थित राहणार आहे. ४ वाजता कोहमारा येथे सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक, तर दि. ५ ला सायंकाळी ४ वाजता तिरोडा येथे शहर, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीला संबोधित करणार आहे. या बैठकींना जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती सदस्य, सहकार क्षेत्राचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले.